#AurangabadCoronaUpdate : 11 रुग्ण कोरोनामुक्त, ५ जणांचा मृत्यू

औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 11 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान शहरातील चार आणि सिल्लोड येथील एक, अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले आहे. या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, बारी कॉलनी, रेहमानिया कॉलनी, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
24 मे रोजी कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा रात्री 9.30 वाजता, गारखेडा येथील 48 वर्षीय पुरूष रुग्णाचा रात्री 9.35 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज 25 मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील 35 वर्षीय महिलेचा, कैलास नगरातील 75 वर्षीय महिलेचा पहाटे 3.15 वाजता आणि सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोनबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.