NandedNewsUpdate : धक्कादायक : मठाधिपती बाल तपस्वी साधू आणि सेवेकऱ्याच्या हत्येने नांदेड जिल्ह्यात खळबळ

नांदेड जिल्ह्यात एका मठाधिपतीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. उमरी तालुक्यातील नागठाणा मठाचे मठाधिपती बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. याशिवाय मठात त्यांच्या एका सेवेकरीचीही हत्या करण्यात आली असून मठातील शौचालयाजवळ एक मृतदेह सापडला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नागठाणा गावातील एका माथेफिरू तरुणाने महाराजांची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला. नंतर महाराजांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. एवढंच नाही तर महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याचा आरोपीचा प्रयत्न केला. महाराजांचा मृतदेहही पळवून नेण्याचा त्याचा इरादा होता. मात्र मठाशेजारी राहाणारे लोक जागे झाल्याचं पाहताच आरोपीने गाडी तिथेच सोडून पळ काढला. गाडीत बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा मृतदेह आढळून आला. शिवाचार्य महाराज हे मूळ कर्नाटकातील रहिवाशी होते.
दरम्यान नागठाणा मठातील शौचालयात आणखी एक मृतदेह आढळला आहे. चिंचाळा गावातील भगवान शिंदे यांचा हा मृतदेह आहे. शिंदे हे मठापतीचे सेवेकरी होते. सेवेकरीचाही खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. भगवान शिंदे हा आरोपी सोबत होता की मठातील सेवेकरी होता, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. महाराज आणि भगवान शिंदे यांचा मतृदेह उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा भाविकांनी घेतला आहे. महाराजांचा खून चोरीच्या उद्देशाने झाला की आणखी काही कारण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनास्थळी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे उमरी तालुक्यात तणावाचे वातावरण आहे.