दुनिया : पाकिस्तानच्या विमानाला अपघात ९७ जण ठार झाल्याची भीती

पाकिस्तानात भीषण विमान अपघात झाला असून या विमानात ८५ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स असे एकूण ९७ जण होते असे सांगण्यात येत आहे . लाहोरहून कराचीला येणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे हे प्रवासी विमान लँडिंग करताना निवासी भागात कोसळले. लँडिंगला फक्त एक मिनिट उरलेला असताना कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली. पीआयए एअरबस ए ३२० प्रकारातील हे विमान आहे.
Shocked & saddened by the PIA crash. Am in touch with PIA CEO Arshad Malik, who has left for Karachi & with the rescue & relief teams on ground as this is the priority right now. Immediate inquiry will be instituted. Prayers & condolences go to families of the deceased.
— Imran Khan (@ImranKhanPTI) May 22, 2020
या विमानात ८५ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स असे एकूण ९७ जण होते असे वृत्त आहे. कोरोना व्हायरसमुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात येत आहेत, त्यामुळे प्रवासी संख्या कमी होती असे पाकिस्तानातील एका पत्रकाराने एका वृत्त वाहिनीवर बोलताना सांगितले. मॉडेल कॉलनी जवळच्या जिना गार्डन भागात हे विमान कोसळले. टीव्हीवरील दृश्यांमध्ये रहिवाशी इमारतींचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे तसेच घटनास्थळावर आग लागली असून धुराचे लोळ उठताना दिसत आहे. नेमकी जिवीतहानी किती झाली ते पाकिस्तानी यंत्रणेने अजून स्पष्ट केलेले नाही. पण अपघातस्थळी गोंधळ आणि भितीचे वातावरण आहे.
दरम्यान लँडिंगच्या मिनिटभरआधी या विमानाशी संपर्क तुटल्याचे पाकिस्तानातील सीएएकडून सांगण्यात आले. स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्स आणि पाकिस्तानी लष्करच्या तात्काळ कृती दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच विमानतळाजवळचा परिसर अरुंद गल्ल्यांचा आहे. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला मदतकार्य करताना अडथळे येत आहेत.