#CoonaVirusMaharashtra : राज्यातील रुग्णांची संख्या ३९ हजारावर , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती

राज्यात गेल्या २४ तासात राज्यात २ हजार २५० नवीन करोना बाधित रुग्ण आढळले असून, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३९ हजार २९७ इतकी झाली आहे, तर बुधवारी राज्यातील ६५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील ४१, पुण्यातील १३, नवी मुंबईतील तीन तसेच उल्हासनगर, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि औरंगाबाद शहरातील प्रत्येकी दोन मृतांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली आहे. राज्यात आज बुधवारी ६७९ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ०७ हजार ७२ नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ७७५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ३९ हजार २९७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ०४ हजार ६९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ७५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत . राज्यात गेल्या २४ तासात ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बळींची एकूण संख्या १ हजार ३९० इतकी झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ४१, पुण्यात १३, नवी मुंबईमध्ये ३, पिंपरी-चिंचवड २, सोलापूरात २, उल्हासनगरमध्ये २, तर औरंगाबाद शहरात २ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४६ पुरुष तर १९ महिला आहेत. ६५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३२ रुग्ण आहेत. वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील ३१ रुग्ण आहेत. दोन जण ४० वर्षांखालील आहेत. या ६५ मृतांपैकी ४८ जणांमध्ये (७४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यात सध्या १ हजार ८४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण १५ हजार ४९५ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.११ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले असे टोपे यांनी सांगितले.