#CoronaVirusEffect : वर्ल्ड बँकेकडून भारताला १ अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर , पहिल्या टप्प्यात गरीब कल्याण योजनेवर खर्च

केंद्र सरकारला कोरोनाशी लढण्यासाठी आता वर्ल्ड बँकेने भारताला १ अब्ज डाॅलरचे कर्ज मंजूर केले आहे. या निधीतून सरकार स्थलांतरित मजूर, कोव्हीड योद्धे यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी खर्च केला जाणार आहे. पुढील वर्षाच्या जून अखेर दोन टप्प्यात हे कर्ज भारताला देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५० दशलक्ष डॉलर येत्या जूनअखेर दिले जाईल. तर उर्वरित २५० दशलक्ष डॉलर जून २०२१ मध्ये भारताला दिले जाईल, असे वर्ल्ड बँकेचे संचालक जुनैद अहमद यांनी सांगितले. भारताला आर्थिक स्थैर्य, आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षेसाठी कर्ज देण्यात आले आहे.
दरम्यान सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी अर्थसहाय्य करणेबाबत सरकारशी चर्चा सुरु असल्याचे अहमद यांनी सांगितले. भारत सरकार कोरोनाच्या लढाईत योग्य दिशेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्ल्ड बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाणार आहे. या योजनेत गरिबांना मोफत अन्नधान्य वाटप, करोना योद्धयांना सामाजिक सुरक्षा, अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे यासारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. एक अब्ज डॉलरचे कर्ज या उपक्रमांना बळ देईल. सरकारला अतिरिक्त निधी उपलब्ध झाल्याने कोरोना रोखण्याबाबतच्या खर्चात वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. मध्यम वर्ग आणि स्थलांतरित मजुरांना सध्या भेडसावणाऱ्या सामन्यांचे निराकरण करण्यासाठी हा निधी उपयोगी पडेल. कोरोना रोखण्याबाबतच्या उपाययोजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून वर्ल्ड बँक काम करेल, असे जुनैद अहमद यांनी सांगितले. आधारामुळे कल्याणकारी योजनांचे लाभ गरीबांपर्यंत पोहचवणे शक्य झाले आहे. आता एक देश एक रेशनकार्डमुळे देशात कुठेही शिधाधारकांना धान्य मिळवणे शक्य होणार आहे.