Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : महाराष्टाच्या लॉकडाऊन बद्दल प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना कळवाव्यात , मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Spread the love

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी  १७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करण्याचे सुचविले असून असून प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे, असे  सांगितले. मुख्यमंत्री आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत होते. लवकरच पावसाळा येत असून पावसाळ्यात साथीचे व इतर आजार पसरतात. करोना संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल. यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्स नियमितरित्या आपल्या सेवा सुरू ठेवतील हे पाहावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याजिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री म्हणाले की, आता मोठ्या प्रमाणावर मजुरांचे येणे जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल ज्यामुळे संसर्ग वाढणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहे. आता मे महिन्यात करोनाची मोठी संख्या पहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला करोनाची साखळी तोडायची आहे, मात्र येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यात साथीचे रुग्ण कोणते आणि करोनाचे रुग्ण कोणते हे पाहावे लागेल. यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले कि , एकीकडे आरोग्य आणीबाणी आहे आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरू करावे लागत आहेत. मात्र ज्या क्षेत्रात ते सुरू होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोन्समध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. पुढील काळात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागेल. मध्यंतरी मी विविध जिल्ह्यांच्या आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यातही आरोग्याविषयी सुविधांच्या कमतरता जाणवल्या होत्या. आरोग्याच्या रिक्त जागाही भराव्या लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी औरंगाबादमधून या कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन आरोग्य विषयक बाबींवर भर द्यावा लागेल तसेच रिक्त पदे भरावी लागतील याविषयी विचार मांडले.

घरोघरी जाऊन तपासणी करा 

गोवा हे महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याएवढे आहे. त्यांनी घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करून काही लक्षणे आहेत का ते तपासले. आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ करोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत, त्याचा आढावा घ्यावा, एकीकडे उद्योग सरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पहा व स्थानिकांमधून हे कामगार उपलब्ध करून द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!