#CoronaVirusUpdate : गुटखा विक्रेत्यावर कारवाई ६६ हजारांचा माल हस्तगत

गुन्हे शाखा पोलिसांनी दलालवाडी भागात विक्रीसाठी गुटखा आणलेल्या चालकाला पकडले. ही कारवाई सकाळी पावणेअकराच्या सुमारास करण्यात आली. सय्यद इम्रान सय्यद हनीफ (३१, रा. दलालवाडी) असे गुटखा विक्रेत्याचे नाव आहे.
दलालवाडी भागात गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे यांना मिळाली होती. त्यावरुन गुन्हे शाखा पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी सिद्दीकी व प्रशांत अजिंठेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर सापळा रचून दलालवाडीतील सय्यद इम्रान याची ट्रक पकडण्यात आली. या ट्रकमध्ये असलेला ६६ हजार १५० रुपयांचा गुटखा पालिसांनी पकडला. त्यासोबतच त्याची ट्रक देखील पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे, अन्न सुरक्षा अधिकारी सिद्दीकी, प्रशांत अजिंठेकर, जमादार सतीश जाधव, चंद्रकांत गवळी, पोलिस नाईक सुधाकर राठोड व सुधाकर मिसाळ यांनी केली.
…..
चक्कर आल्याने मृत्यू
औरंगाबाद : घरात चक्कर येऊन पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घरात चक्कर आल्याने सुनिता गोपाळ भुतडा (३२, रा. भारतनगर, गारखेडा) यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
……..
दीर्घ आजाराने मृत्यू
औरंगाबाद : दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या वृध्देचा ९ मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. लक्ष्मीबाई गणपत राऊत (७६, रा. निर्मलनगर, मुकुंदवाडी) या कॅन्सरने आजारी होत्या. तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना ९ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घाटीत दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा रात्री साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
……