#MaharashtraCoronaVirusUpdate : राज्यातील ५३१ पोलिसांना कोरोनाचा विळखा , ३९ जणांवर यशस्वी उपचार , ५ पोलिसांचा मृत्यू

राज्यात कोरोनाविरोधातील लढाईत आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांच्या खांद्याला खांदा देऊन कार्यरत असणाऱ्या राज्यातील ४८७ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे दिली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. १७ मे रोजीपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. ‘लॉकडाऊननंतर आतापर्यंत राज्यातील ४८७ पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे,’ असं गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान पोलीस हेल्पलाइन क्रमांक १०० वर कोविड -१९ शी संबंधित चौकशी करणारांची संख्या वाढली आहे . आतापर्यंत या क्रमांकावर ८५, ३०९ दूरध्वनी आले आहेत. त्याच बरोबर पोलिसांनी आवश्यक सेवा पुरवणाऱ्या आणि आपत्कालीन स्थितीत अडकलेल्या लोकांना आतापर्यंत ३, १०, ६९४ पास जारी केले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
इतर माहिती देताना देशमुख यांनी म्हटले आहे कि , राज्य सरकारकडून ४७३८ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहे. तेथे ४,३५,०३० परराज्यांतील मजुरांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अवैध वाहतुकीचे जवळपास १,२८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर कलम १८८ अन्वये ९६, २३१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात १८, ८५८ जणांना अटक करण्यात आली आहे. ५३,३३० वाहने जप्त करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण ३, ५६, ८१, ९९४ रुपयांची दंडवसुली केली आहे. तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या १८९ घटना घडल्या आहेत, अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यातील ५३१ पोलीस कोरोनाबाधित…
दरम्यान गृहमंत्री देशमुख यांनी माहिती दिल्यानंतर राज्यात गेल्या २४ तासांत ७५ पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. आता कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या ५३१ झाली आहे. तर आतापर्यंत ५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यात मुंबईत ३, पुण्यात १ आणि सोलापुरात एकचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत २३३ पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. तर आज औरंगाबादेत एक पोलीस निरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे . त्यांची नियुक्ती नियंत्रण कक्षात आहे मात्र ते गेल्या काही दिवसांपासून ड्युटीवर आले नसल्याने नियंत्रण कक्षाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे . त्यात सकारात्मक बाब म्हणजे ३९ पोलिसांनी कोरोनावर मात केली असली तरी राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल ५३१ वर पोहोचली आहे. यामध्ये ५१ अधिकारी आणि ४८०पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईतील एक आयपीएस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.
याशिवाय या पूर्वी काही डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुंबईतल्या ५३ पत्रकारांनाही कोरोनाने गाठले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर तैनात API ला कोरोना सदृष्य लक्षणं दिसून आली आहेत. दुसरीकडे, राजभवन, सह्याद्री गेस्ट हाऊस, मंत्रालय आणि इतर महत्त्वाच्या सर्व कार्यालयांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनाही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सॅनिटाजेशनचं काम सुरू आहे. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.