#CoronaMaharashtraUpdate : राज्यात गेल्या २४ तासात ५८३ नवीन रुग्णांची नोंद तर २७ रुग्णांचा मृत्यू , १८० रुग्णांना डिस्चार्ज ….

राज्यात काल गुरुवारी गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे एकूण रुग्णसंख्या १० हजार ४९८ इतकी झाली आहे. काल दिवसभरात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील २० रुग्णांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या ४५९ झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले कि , आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात १ हजार ७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८ हजार २६६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले असून, १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईतील करोनाबाधित रुग्णांचा आकडा ७ हजार ०६१ असून, आजतागायत मुंबईत करोनामुळे २९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूंची संख्या ४५९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील तीन आणि ठाणे शहरातील दोन रुग्ण आहेत. याशिवाय नागपूर शहर आणि रायगडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर ८ महिला आहेत. २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत. तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
दरम्यान राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७३३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ९२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४२.११ लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.