#AurangabadCrimeUpdate : शेतात जाण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला, सात जणांविरूध्द गुन्हा दाखल
औरंंंगाबाद : शेतातील रस्त्याच्या कारणावरून सात जणांनी दोन जणांवर कु-हाड आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
तुकाराम आसाराम कान्हेरे (वय ३५), ज्ञानेश्वर कान्हेरे, दोघे राहणार शरणापूर असे प्राणघातक हल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. ज्ञानेश्वर कान्हेरे व तुकाराम कान्हेरे हे दोघे २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शरणापूर शिवारातील शेतात गेले होते. त्यावेळी गोपीचंद सखाराम शिंदे, विष्णू कचरू कान्हेरे, सयाजी गोपीचंद कान्हेरे, उध्दव गोपीचंद कान्हेरे, रामकिसन कचरू कान्हेरे, नितीन विष्णू कान्हेरे, कल्याण रामकिसन कान्हेरे, सर्व रा.शरणापूर यांनी आमच्या शेतातून का जाता असे म्हणत ज्ञानेश्वर कान्हेरे, तुकाराम कान्हेरे यांच्यावर कु-हाड आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत ज्ञानेश्वर कान्हेरे व तुकाराम कान्हेरे हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.