#CoronaVirusUpdate : लॉकडाऊन , कोरोना आणि पालघरच्या घटनेवर शरद पवारांनी केले हे भाष्य …

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात जनतेशी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधला. यावेळी बोलताना पवार म्हणाले कि , मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि पुण्यातील करोना रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ऊर्वरित महाराष्ट्रातील चित्रं समाधानकारक आहे. थोडी काळजी घेतली तर ऊर्वरित महाराष्ट्रात सुविधा देणं शक्य आहे. प्रत्येकाने काळजी घेतली तर या ठिकाणी अंशत: शिथिलता आणणं शक्य आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देता येईल. शेतीची काम सुरू करता येईल. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून ही अर्थव्यवस्था रुळावर आणणं शक्य होईल, असं सांगतानाच मुंबई, ठाणे आणि पुण्यात परिस्थिती चिंताजनक असल्याने या ठिकाणी लॉकडाऊनची नियमावली आणखी कठोर करायला हवी, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.
पालघरचे प्रकरण निषेधार्हच , पण राजकारण करू नका…
पालघर येथी मॉब लिंचिंगच्या घटनेवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले कि , ‘एका घटनेच्या आधारे महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालघरला झालं त्याचा आणि कोरोनाचा काही संबंध नाही. पालघर प्रकरणाचा संबंध शोधण्यासाठी जी काही नेमणूक करायची आहे ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्य सरकारने खबरदारी घेतली आहे. असा एखादा प्रकार गैरसमजुतीनं घडला की लगेच राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. घडलेलं प्रकरण निषेधार्ह आहे. ते घडायला नको होतं. पण यामध्ये कोणीही राजकारण करू नये.’
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातील तीन आठवड्यात करोनाच्या रुग्णांचं प्रमाण वाढल्याने केंद्र सरकारला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागला. आज लॉकडाऊनचा २९ वा दिवस आहे. अजून १२ दिवस लॉकडाऊन पाळायचा आहे. त्यामुळे काळजी घ्या. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. संसर्गामुळे हा आजार होत असल्याने दोन व्यक्तींमधील अंतर ठेवलं पाहिजे. पण अनेक ठिकाणी लोक हे अंतर पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये अंतर पाळलं गेलं नाही तर करोनाची स्थिती कुठेही आणि केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे घरातच राहा. काळजी घ्या, असं सांगतानाच आपण केंद्राच्या नियमांचं तंतोतंत पालन केल्यास हे संकट कमी होऊ शकेल. त्यामुळे ३ मे नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित लॉकडाऊनमद्ये शिथिलता देऊ शकतील, असं पवार यांनी सांगितलं.
जगात निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटाविषयी बोलताना पवार म्हणाले की , अमेरिका सारख्या धनिक देशात सर्व साधन संपत्ती आहे. तरीही अमेरिकासारखी महाशक्ती करोनाच्या संकटात सापडली आहे. इतर पाश्चिमात्य देशात मृतांचा आकडा ज्यापद्धतीने वाढत आहे, त्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. खरं तर अशी तुलना करणं योग्य नाही. मात्र, तरीही आपल्याला गाफिल राहून चालणार नाही, असं सांगतानाच इटली, स्पेन, फ्रान्स आणि इंग्लंडच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती चांगली आहे. मात्र आपल्या देशाच्या परिस्थितीची महाराष्ट्राशी तुलना करता राज्याची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे, असंही त्यांनी सांगितलं. आपल्याला सध्याच्या परिस्थितीवर मात करायची आहे. राज्य आणि देशातील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा रेट शुन्यावर आणायचा आहे. हे आपण ठरवलं पाहिजे आणि हे आपण करू शकतो, असा विश्वासही त्यांनी राज्यातील जनतेला दिला.