#CoronaVirusUpdate : २० एप्रिलनंतर करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या व हॉटस्पॉटमध्ये नसलेल्या भागांना काही प्रमाणात दिलासा…, आदेश जारी

राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन, अटी व शर्तींच्या अधीन राहून २० एप्रिलनंतर औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू होणार. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहण्याच्या दृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे pic.twitter.com/Ohu9aBFc04
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2020
राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या निर्णयानुसार दि. २० एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन, लॉकडाऊनबाबतच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायीक उपक्रम सुरू केले जात आहेत. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहण्याच्या दृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे. केंद्राच्या दिशानिर्देशानुसार २० एप्रिलनंतर करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या व हॉटस्पॉटमध्ये नसलेल्या भागांना काही प्रमाणात दिलासा देण्यात येणार आहे. लॉकडाऊनसंदर्भात महाराष्ट्र शासनाने नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली असून त्यात कशाप्रकारे सूट मिळणार आहे, याचा उहापोह करण्यात आला आहे. कोरोनाचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य अबाधित टेवून कंटेनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, शेती, फळबागा व शेतीपूरक उद्योग, नारळ, काजू आणि मसाला बागांमधील कामे, कुक्कुट पालन, बँकांच्या शाखा, एटीएम, ई-कॉमर्स कंपन्या सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट देण्यावर भर देण्यात आला आहे. केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. त्याचे अतिशय काटेकोर पालन केले जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळण्यासह नियमित मास्क घालणे आणि इतर कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कुठल्याही कारणांसाठी गर्दी चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थना स्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी नाही. लोकांना अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू मात्र विनाअडथळा मिळत राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या आदेशानुसार….
शासकीय कार्यालयांत १० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एस.टी. बस आणि बेस्ट बसची विशेष सुविधाही उपलब्ध करण्यात आली असून मंत्रालयात आणि इतर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बोरिवली, वांद्रे, पनवेल, ठाणे, विक्रोळी, वरळी, गोराई, ऐरोली, दहिसर, राणी लक्ष्मीबाई चौक, आणिक आगार आदी ठिकाणांपासून अतिरिक्त बसेस सुटणार आहेत.
शासकीय कार्यालय आणि इतर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळामार्फत २१ एप्रिलपासून मंत्रालयापर्यंत अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन. त्यानुसार पनवेल, ठाणे, पालघर आदी ठिकाणांपासून एकूण ५० नवीन फेऱ्या सुटणार. शेती, शेतीपूरक उद्योग,द्राक्ष उत्पादक, मनरेगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, ई-कॉमर्स व्यवसाय, कम्युनिटी किचन याबाबत संबंधित यंत्रणांनी केंद्रीय मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी यासंदर्भातील अंमलबजावणीचे पत्र सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि प्रशासकीय प्रमुखांना पाठविले असून या निर्णयांवर कार्यवाही करण्याचे व कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.