#CoronaVirusUpdate : रेशनिंग संदर्भात उपमख्यमंत्र्यांचे पलकमंत्र्यांना पत्र….

राज्यातील गोरगरीब जनतेला कोरोना संकटकाळात रेशन दुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचं प्रमाण वाढवण्यात आले असून या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावे , वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तिचे तात्काळ निराकरण करावे आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी, यासाठी सर्वं पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तिश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून केले आहे. रेशन दुकानांमधून पुरेसं अन्नधान्य उपलब्ध केलं जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे पवारांनी लक्ष वेधलं आहे.
शासनाने रेशनिंगसाठी उपलब्ध केलेल्या धान्यसाठ्याची माहितीही त्यांनी पत्रात दिली आहे. ‘राज्यातील रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा ३.८७ लाख मेट्रीक टनांवरून ७.७४ लाख मेट्रीक टनांवर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना १.५२ लाख मेट्रीक टनांचं अतिरिक्त धान्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे. गरीब नागरिकांना पुरेसं धान्य मिळावं, कुणीही उपाशी राहू नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातील करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सर्वस्तरावर उत्तम काम करत असल्याचं सांगून उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेचं कोतुक केलं आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ७ कोटी नागरिकांना तीन महिन्यांसाठी २ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ रेशन दुकानांवरून देण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या ५ किलो मोफत तांदळाचं वाटपही सुरू आहे. केशरी कार्डधारकांना ८ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वत्र धान्यवाटप सुरू असून काही जिल्ह्यांमधून येणाऱ्या तक्रारींमुळे शिधावाटप यंत्रणेची, शासनाची नाहक बदनामी होत आहे. ही बदनामी टाळली पाहिजे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील शिधावाटप यंत्रणेत गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं त्यांनी पत्रात पुढं म्हटलं आहे. शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील सूचना व तक्रारींसाठी राज्य शासनाने राज्यस्तरावर १८००२२४९५० आणि १९६७ हे टोल फ्री दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधून सूचना द्याव्यात, तक्रारी दूर कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.