#CoronaVirusEffect : पुण्यातील बळींची संख्या वाढत असल्याने ससूनच्या “डीन “ची तडकाफडकी बदली…

पुणे येथील ससून रुग्णालयात बुधवारी रात्रीपासून आतापर्यंत तीन महिला रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे पुण्यातील करोना बळींची संख्या ४६ वर पोहोचली आहे. त्यापैकी तब्बल ३७ मृत्यू ससूनमध्ये झाले आहेत. त्यामुळे सासुंमधील वाढते मृत्यू लक्षात घेता , बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ‘ससून’ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने बुधवारी सायंकाळी तडकाफडकी बदली केली. त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचा सहसंचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ‘ससून’ रुग्णालयात ‘करोना’च्या रुग्णांचा मृत्यूदर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बदली झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, पुण्यात ‘करोना’चा संसर्ग सुरू झाला. त्यात ‘करोना’च्या संसर्गाने सर्वाधिक मृत्यू होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयावर टीकेची झोड उठविली जात होती. मात्र, रुग्णालयात येणारा रुग्ण हा अंतिम टप्प्यात येत असल्याने चोवीस तासही रुग्णालयात उपचाराची संधी डॉक्टरांना मिळत नसल्याचे दिसून आले. या संदर्भात टीका सुरू राहिल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. चंदनवाले यांची बदली करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही ‘ससून’मध्ये होणाऱ्या उपचाराबाबत ‘प्रोटोकॉल’साठी समिती स्थापन केली. त्या समितीचे काम नुकतेच सुरू झाले आहे. त्यात डॉ. चंदनवाले यांची बदली झाली असून, आता त्यांचा कार्यभार उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविला जाणार आहे. डॉ. चंदनवाले यांच्याकडे यापूर्वी वैद्यकीय शिक्षण खात्याचा सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच डॉ. चंदनवाले यांची जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्य सरकारने त्यांची पुन्हा पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली होती आणि आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे.