Maharashtra politics : अपयश झाकण्यासाठी भाजपा प्रवक्त्यांवर गुन्हा दाखल, शिरीष बोराळकर यांचा आरोप

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना प्रशासकीय पातळीवरचे अपयश लपवण्यासाठी आणि दरम्यान उघडकीस आलेले नियमबाह्य प्रकार झाकण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबाव आणून गुन्हे दाखल करण्याचा निंदनीय प्रकार राज्य सरकारने चालवला असल्याची टीका करून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.
येस बँकेतील आरोपी वाधवान बंधू यांना महाबळेश्वरला जाण्यासाठी राज्याच्या गृहसचिवांनी परवानगी दिल्या प्रकरणी गृहमंत्र्यांवर टीका केली म्हणून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या विरोधात काल लातूर आणि नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भाजपाच्या बाजूने बोलणाऱ्या आणि राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेवर टीका करणाऱ्या पदाधिकाऱयांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी करण्याची मोहीम राबवली जात आहे. राजकीय दबाव आणून गुन्हे दाखल केले जात आहे. भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी सांसदीय शब्दात गृहमंत्र्यांवर टीका केली होती. विरोधी पक्षाची मुस्काटदाबी करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा शिरीष बोराळकर नी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
राज्यभर अनेक भाजपा समर्थकांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. राज्यातील मंत्री यांच्या समक्ष व त्यांच्याच संमतीने अनंत करमुसे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्या अनंत करमुसे यांच्या पोलीस तक्रारींवर अजून कुठलीच कारवाई झाली नाही. पण जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात फेसबुक वर लिहीणाऱ्या एका सामान्य युवकावर जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपले अपयश लपवण्यासाठी असे लोकशाहीला काळिमा फासणारे प्रकार केले जात असल्याचा गंभीर आरोप देखील शिरीष बोराळकर यांनी केला आहे.