#CoronaVirusEffect : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या वयोगटावर एक नजर….

महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत ३५ हजार ६६८ इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचणी झाल्या असून त्यापैकी केवळ ४ टक्के रुग्ण हे कोरोना बाधित आढळले. तर उर्वरित ९६ टक्के रुग्णांच्या चाचण्या या नकारात्मक आढळून आलेल्या आहेत. महाराष्ट्रात रुग्णसंख्या भारतातल्या इतर कुठल्या राज्यापेक्षाही जास्त आहे. तसंच महाराष्ट्राच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असं दिसून येतं की कोरोना महाराष्ट्रातल्या तरुणाईला टार्गेट करत आहे. महाराष्ट्रातल्या १७६१ रुग्णांच्या वयोमान आकड्याकडे लक्ष केंद्रित केलं तर १ ते ५० या वयोगटातील रुग्णसंख्या ही १०७१ एवढी आहे तर पन्नाशी ते ते शंभर वयोगटातील रुग्णांच्या संख्येकडे बघितलं तर ती केवळ ४७४ इतकी आहे. यावरून कोरोना हा केवळ वयोवृद्ध लोकांना होणारा आजार आहे हे वाक्य चुकीचे ठरते. त्याऐवजी कोरोनाची लागण होत असताना वय हा मुद्दा आता महत्त्वाचा राहिलेला नाही असंच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात स्त्री-पुरुष याप्रमाणे वर्गवारी केली तर एकूण रुग्णांमध्ये ९५४ पुरुष तर ६२० महिला आहेत. कोरोन बाधित पुरुषांची संख्या ही ६१% इतकी आहे तर महिलांची संख्या ३९% इतकी आहे. मृत्यूबाबतही आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यू पैकी ८७ मृत्यू हे पुरुषांचे तर ४० मृत्यू हे महिलांचे झाले आहेत.