औरंगाबाद पाठोपाठ जालना जिल्ह्यातही बंदोबस्तवरील पोलिसांना अवैध दारू विक्रेत्यांची मारहाण !!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना औरंगाबादेत मारहाण झाल्यानंतर जालन्यातही असाच प्रकार समोर आला असून यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. याविषयी अधिक माहिती अशी कि , अवैधरित्या पकडलेल्या दारू साठ्याचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह ४ कर्मचारी आणि पंचांवर अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील हिसोडा बुद्रुक-जळकी बाजार शिवारात घडली आहे. या हल्यात पारध पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह ४ पोलीस व पंच ही गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर रेणुकाई पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच भोकरदन विभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांचे मनोबल खच्ची होण्याची भीती आहे. त्यामुळे असे हल्ले रोखण्यासाठी या प्रकरणातील आरोपांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी आता समोर येत आहे. त्यामुळे याबाबत सरकारी पातळीवर काही हालचाली होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.