#CoronaVirusUpdates : मुंबईची स्थिती चिंताजनक , काही भागाच्या बाबतीत शासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…..

दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत असून आज दिवसभरात कोरोनाच्या संसर्गानं २५ जणांचा बळी गेला आहे. तर २२९ रुग्णांची नव्यानं नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३६४ झाली असून मृतांचा आकडा आता शंभराच्या जवळपास पोहोचला आहे. आज एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे ७९ नवीन रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासांत शहरात कोरोनामुळे ९ जण दगावले आहेत तर विविध रुग्णालयांत दाखल असलेले ६ करोनाबाधीत आज पूर्णपणे बरे झाले आहेत.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन १०० टक्के नेटाने राबविणे हा एकमात्र उपाय असून, त्यासाठी नवी रणनिती आखली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलीस विभागाने जरुर चांगले काम केले आहे. पण काही भागात लॉकडाऊन व संचारबंदी प्रभावी करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बोलाविण्याशिवाय पर्याय नाही. दाट लोकवस्ती आणि गर्दीच्या भागात प्रभावीपणे संचारबंदी करण्याची गरज आहे. राज्य राखीव पोलीस दल, मुंबई पोलीस, सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे, असे टोपे म्हणाले.
राज्यातील कोरोनाच्या समस्येवर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे कि , मुंबईमधील कोरोनाबाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. मुंबईतील काही दाटीवाटीच्या लोकवस्तीतील लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. राज्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा १३६४ असून, त्यात ५० टक्यांपेक्षा अधिक म्हणजे ८७६ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईमधील रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असून, त्यासाठी वेगळी रणनीती आखली जात असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.