#CoronaVirusUpdate : जगभरातील मुस्लिमांना घराबाहेर न पडण्याची इम्रान खानने का केली विनंती ?

देशभरातील मुस्लिमांचा आज ‘शब्ब-ए-बारात’ हा एक महत्वाचा सण असला तरी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात लॉक डाऊन सुरु असल्याने दरवर्षीसारखे या सणाच्या दिवशी कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला बाहेर पडणे शक्य नाही. या निमित्ताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही जगभरातील मुस्लिमांना आज एक ट्विट करून घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि , करोनाने जगभरात थैमान घातले असल्याने अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे लोकांच्या गर्दी करण्यावर निर्बंध आले असून लोकांना घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना घरात थांबूनच सण साजरे करण्यास सांगण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे मुस्लीम धर्मात शब्ब-ए-बारातला वेगळं महत्त्व आहे. शब्ब-ए-बारातच्या रात्री सर्व मुस्लीमधर्मीय कब्रस्थानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या कबरीवर चादर चढवून तेथे दुआ करतात. मात्र यावेळी करोनामुळे लोकांना घराबाहेर न पडता घरातूनच प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “माझी जगातील सर्व मुस्लिमांना विनंती आहे की, आज रात्री शब्ब-ए-बारातच्या निमित्ताने अल्लाहकडे विशेष प्रार्थना करत आशीर्वाद आणि क्षमा मागा”.
दरम्यान पाकिस्तानातही करोनाने थैमान घातलं असून पाकिस्तानात कोरोनाचे ४९२६ रुग्ण आहेत. आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४६७ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. कोरोनाचा सर्वात जास्त फटका पाकिस्तानमधील पंजाब प्रांताला बसला आहे. तिथे कोरोनाचे २१६६ रुग्ण सापडले आहेत. तर सिंध प्रांतात १०३६, खैबर पख्तून्ख्वां ५६०, गिलगीट बाल्टिस्तान २११ आणि इस्लामाबादमध्ये ८३ रुग्ण सापडले आहेत.