#CoronaVirusUpdate : दुनिया : मोठी बातमी : ब्रिटनचे पंतप्रधान अखेर हॉस्पिटलमध्ये दाखल ,प्रिन्स चार्ल्स झाले कोरोनातून मुक्त पण आयुर्वेदिक उपचारांनी नव्हे…

United Kingdom Prime Minister Boris Johnson's office says he has been admitted to the hospital as he is suffering from #Coronavirus symptoms: The Associated Press
He had tested positive for #COVID19, late last month. (File pic) pic.twitter.com/vIHIQ45zm0
— ANI (@ANI) April 5, 2020
जगभर कोरोनाचा कहर चालूच असून ब्रिटनमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे आणि मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. शनिवारी, ब्रिटनमध्ये एकाच दिवसात ७०८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, करोनाबाधितांची संख्या ही ४० हजारांहून अधिक झाली आहे. दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना गेल्या महिन्यात कोरोना झाल्यानंतर त्यांनी स्वतःला घरातच कोंडून घेतले होते परंतु अधिक रिस्क नको म्हणून त्यांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ब्रिटनमध्ये करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ८३ हजारजणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४१ हजार हजार ९०३ जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. करोनाच्या आजाराने चार हजार ३१३ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी, ७०८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, शुक्रवारी ३ एप्रिल रोजी ६८४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये खबरदारीचे विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडे लंडनमध्ये चार हजार खाटांची सुविधा दहा दिवसांच्या आत उभी करण्यात आली आहे. शुक्रवारी ती सर्वांसाठी खुली झाली. तर, एक हजार ५०० रुग्णांसाठी पश्चिमेस ब्रिस्टल आणि उत्तरेकडील हॅरोगेट येथे दोन सुविधा नव्याने केल्या जात असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य सेवेने (एनएचएस) एका निवेदनात दिली आहे. पुढील काळात बर्मिंगहॅम आणि मँचेस्टर येथेही अशी रुग्णालये सुरू होत असून, तेथे तीन हजार खाटांची सोय असेल, असे ‘एनएचएस’च्या निवेदनात नमूद केले आहे.
प्रिन्स चार्ल्स कोरोनातून मुक्त झाले पण आयुर्वेदिक उपचारांनी नव्हे , भारतीय केंद्रीय मंत्र्यांचा दावा खोडला….
प्रिन्स चार्ल्स यांना कोविड-१९ संक्रमित झाल्यानंतर त्यांनी आयुर्वेदीक उपचार घेतल्यानेच ते बरे झाले, असा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दक्षिण भारतातील एका रिसॉर्टने त्यांच्या आयुर्वेदिक आणि होमियोपथी उपचार केल्यानेच प्रिन्स चार्ल्स बरे झाल्याचा दावा नाईक यांनी नुकताच केला होता. प्रिन्स चार्ल्स यांचा स्व-विलगीकरणाचा कार्यकाळ संपल्यानंतर शुक्रवारी त्यांनी राष्ट्रीय स्वास्थ सेवेच्या (एनएचएस) तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर शनिवारी राष्ट्रीय आरोग्य सेवा विभागाच्या सल्ल्यामुळे ते बरे झाल्याचे क्लेरेन्स कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी, बेंगळुरूमध्ये सौख्य आयुर्वेद रिसॉर्ट चालवत असलेल्या डॉ. आयझॅक मथाई यांनी, त्यांना प्रिन्स चार्ल्स यांच्यावर आयुर्वेदिक आणि होमिओपथीचे उपचार यशस्वी ठरले आहेत, असे सांगितले होते. मात्र ही माहिती चुकीची आहे. प्रिन्स ऑफ वेल्स यांनी इंग्लडमधील एनएचएसच्या वैद्यकीय सल्ल्याचे पालन केले, त्याशिवाय अन्य कोणतेही उपचार त्यांच्यावर झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अमेरिकेतही कोरोनाचा घट्ट विळखा , आठ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू….
करोना विषाणूने अमेरिकेभोवतीचा विळखा घट्ट केला असून शनिवारपर्यंत आठ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवार ते शुक्रवारमधील २४ तासांमध्ये तेथे तब्बल १४८० जणांचा मृत्यू झाला. तर, शनिवारी जवळपास १३०० जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी नोंदवण्यात आलेल्या मृतांची संख्या ही आतापर्यंत एका दिवसात एका देशात करोनामुळे झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. दरम्यान, अमेरिकेने मदतकार्यासाठी लष्कराची मदत घेण्यास सुरुवात केली असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही लष्कराची या लढ्यातील भूमिका वाढवत असल्याचे जाहीर केले. करोना विषाणूंच्या प्रादुर्भावातून अमेरिकेत आतापर्यंत आठ हजार ४५२ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत तीन लाख ११ हजार ३५७ जणांना करोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेमध्ये करोनाच्या फैलावाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क राज्याला बसला आहे. शनिवारी न्यूयॉर्कमध्ये ६३० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . दिवसातील प्रत्येक अडीच मिनिटांनी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. न्यूयॉर्कमध्येच आतापर्यंत तीन हजारांहून अधिकजणांना आजारामुळे प्राण गमवावे लागले आहेत.