Aurangabad Crime : देशी दारुचे दुकान फोडले, उस्मानपुरा पोलिसांनी बारा तासात चोरटे मुद्देमालासह केले गजाआड….

औरंंंगाबाद : संचारबंदीच्या काळात शहानूरवाडीतील देशी दारुचे दुकान फोडून बाटल्या लांबविणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अवघ्या बारा तासात उस्मानपुरा पोलिसांनी केली. पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून ९६ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ प्रकाश मन्नुलाल जैस्वाल , रा. ज्योतीनगर यांची देशी दारुची दुकान आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच दुकाने सध्या बंद आहे. त्याचा फायदा घेऊन अक्षय उर्फ ऊ-या सुनील अहिरे व सागर अशोक पिंगळे यांनी अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने जैस्वाल यांचे दुकान फोडले. हा प्रकार रविवारी सकाळी सातच्या सुमारास नोकर जितेंद्र जैस्वाल यांच्या निदर्शनास आला. या घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलिसांसह गुन्हे शाखा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक फौजदार कल्याण शेळके, जमादार प्रल्हाद ठोंबरे,सतीश जाधव, संतोष शिरसाठ, संजयसिंग डोभाळ यांनी तिघांना पकडले. तिघांविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.