#CoronaVirusUpdate : राज्यातील परिस्थिती आणि लॉकडाऊनबद्दल आरोग्य मंत्र्यांचे भाष्य …

कोरोना व्हायरस ने देशात आणि राज्यात कहर केला असून राज्यातील रुग्णांची संख्या महाराष्ट्रातही झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ६९० वर पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये १४ एप्रिलनंतरही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ‘इतर शहराच्या तुलनेत मुंबईत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या जास्त वाढताना दिसत आहे. ही काळजीची गोष्ट असून लोकांनी बाहेर पडू नका, खबरदारी घ्या. एकदम लॉकडाऊन संपणार नाही. जिथं काहीच नाही तिथं प्रथम लॉकडाऊन हटवला जाईल. पण जिथं संख्या जास्त तिथं वेगळा विचार करून निर्णय घेतला जाईल असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान आरोग्यमंत्र्यांनीच आता थेट लॉकडाऊन वाढवण्याबाबतचे संकेत दिल्याने महाराष्ट्रातील ही लॉकडाऊनचा कालावधी वाढणार हे निश्चित आहे. मात्र त्यांच्या बोलण्यावरून काही जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल केला जाण्याची शक्यता आहे. कारण जिथं रुग्णांची संख्या कमी आहे, तेथील लॉकडाऊनबद्दल विचार केला जाईल, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत. त्यामुळे १४ एप्रिलनंतर सरकार नेमका निर्णय घेणार, हे पाहावं लागेल. ‘कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागातच फक्त लॉकडाऊन संपवण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये सर्व जिल्हे कोरोना प्रभावित नाहीत. त्यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लॉक करणे काही अर्थ नाही. फक्त हॉट स्पॉट असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन सुरू राहील,’ असं आयसीएमआरने सांगितलं आहे.
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मुंबईत कोरोनाचा सर्वाधित धोका असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मुंबईत ३० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मुंबई शहराची इतर राज्यांशी तुलना केल्यास ही संख्या खूप जास्त आहे. सध्या मुंबईत एकूण ४३३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मुंबईत ३० जणांचा मृत्यू झाला असून गेल्या तीन दिवसात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची तपासणी केली जात आहे. मृत्यू झालेल्यांमधील ६ जणांना दीर्घकालीन आजार होता. तर यापैकी २ जणं वृद्ध होते. आज मृत्यू झालेल्यांमध्ये ७ जण हे पुरुष असून १ महिला होती. यांचे वय ५० ते ८० या दरम्यान असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा ३००० च्या पार गेला असून ७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. काल आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. धारावी या भागात तब्बल ७ ते ८ लाख नागरिक राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाचा फैलाव जलद गतीने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याचं सांगितले असले तरी रुग्णांची संख्या कमी न झाल्यास ही मर्यादा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील निजामुद्दीन जमात या कार्यक्रमातील अनेक सदस्यांनी मुंबईतील धारावीत वास्तव्य केल्याचे समोर आल्यानंतर भीती वाढली आहे.