#CoronaVirusEffect : नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ च्या घरात , ३८ निगेटिव्ह तर आज फक्त १ पॉझिटिव्ह

राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर चालूच असून ‘अहमद नगरमध्ये करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण आलमगीर (ता. नगर) या भागातील रहिवासी असून, तो ३१ वर्षांचा आहे. ‘करोना’बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला ‘करोना’ची लागण झाली आहे,’ अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान आतापर्यंत नगर जिल्ह्यात २१ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी दोन रुग्णांचे चौदा दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
पुण्याच्या एनआयव्हीकडे येथील जिल्हा रुग्णालयाने आज सकाळपर्यंत ७३ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी रविवारी दुपारी ३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामध्ये आलमगीर येथे राहणाऱ्या एका जणाचा अहवाल हा ‘करोना’ पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला ‘करोना’ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला तातडीने ‘आयसोलेशन वार्ड’मध्ये हलवण्यात आले आहे. तर, उर्वरीत ३८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने ‘करोना’ची लागण झालेल्यांची संख्या जिल्ह्यात वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या थांबताना दिसत नाहीत. राज्यात गेल्या १६ तासांत ५५ नवे करोना रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६९० वर गेली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.