#CoronaVirusEffect : पुण्यात आढळले कोरोनाचे ११ नवे रुग्ण तर वाशीमध्ये एक , केंद्रीय सुरक्षा बाळाच्या आणखी ६ जवानांना कोरोना !!

वाशिममध्ये आज करोनाचा पहिला रुग्ण आढळला असून हा करोनाग्रस्त तरुण दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झाला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाल्याने वाशिममध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पुण्यातही ११ नवे रुग्ण आढळल्याने पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत तबलिगी जमातचे धार्मिक संमेलन झाले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील भाविकांनी सहभाग नोंदविला होता. वाशिम जिल्ह्यातील एक जण या संमेलनात सहभागी होवून परत आल्याचा संशय जिल्हा प्रशासनाला आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज, त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून हा तरुण दिल्लीतून आल्यानंतर कुणाकुणाच्या संपर्कात आला होता, याचा शोध घेतला जात आहे. तसेच या तरुणाच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे जिल्ह्यात आज ११ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले , एकूण संख्या ७१
दरम्यान, अमरावतीत आज ३३७० लोकांची तपासणी करण्यात आली. या लोकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. यातील १२३ लोकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ९१ जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २१ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. पुण्यातील करोना रुग्णांची संख्याही थांबताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात आज ११ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले असल्याने पुण्यातील रुग्णांची संख्या ७१ झाली आहे. काल ही संख्या ६० होती. काल रात्री उशिरा दोन आणि आज दिवसभरात नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने ही संख्या ७१ झाली आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
खारघर : केंद्रीय सुरक्षा बलाच्या ११ जवानांना कोरोना
दरम्यान केंद्रीय सुरक्षा बलाच्या खारघर येथे नियुक्त असलेले १३९ अधिकारी आणि सेवेसाठी असलेल्या १२ जणांपैकी ५ जवानांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर आता आणखी ६ जवानांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून गुरुवारी रात्री उशिरा १४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळंबोली येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश जारी केले होते. त्यानंतर तात्काळ या सर्वांची करोना चाचणी घेण्यात आली असता यापैकी ६ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तात्काळ विलगीकरणात ठेवल्यामुळे करोना संसर्ग वाढण्याचा धोका टळला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आल्या असून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी या प्रकरणी विशेष लक्ष घातल्यामुळे नवी मुंबई परिसरातील संभाव्य धोका कमी झाला आहे. कोकण विभागात अन्य जिल्ह्यांत अशाप्रकारे कोणताही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.