#CoronaVirusUpdate : दिलासादायक , पुण्यातील कोरोनाग्रस्त बरे होऊन जाताहेत आपापल्या घरी…

पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असले तरी दुबईवरून पुण्यात आलेले कोरोनाची लागण झालेले दाम्पत्य १४ दिवसांत पूर्णपणे बरे झाल्यानंतर आता आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. आणखी तिघे करोनामुक्त झाले आहेत. त्यांना उद्या, गुरुवारी घरी सोडण्यात येणार आहे. दुबईहून आलेल्या दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यांना ९ मार्चला नायडू रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांना विलगीकरण कक्षातही ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या २४ तासांत त्यांची दोनदा तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर, रुग्णालय प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. आता आणखी एक दिलासा देणारी बातमी आहे. या दाम्पत्यानंतर आणखी तिघे जण करोनामुक्त झाले आहेत. त्यांना उद्या, गुरुवारी घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
दरम्यान राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा १२२ वर पोहोचला आहे. नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ७, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे ५, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बाधित रुग्णांपैकी सांगलीचे ५ जण हे काल बाधित आढळलेल्या ४ रुग्णांचे निकट सहवासित आहेत. करोनाच्या संसर्गामुळे जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. करोना संसर्गामुळे इटलीत मृत्यूंचे थैमान सुरू आहे. तर, दुसरीकडे स्पेन, अमेरिकेतही करोनाचा वाढता संसर्ग व मृ्तांच्या वाढत्या आकडेवारीने लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. मात्र, करोनाच्या संसर्गावर मात करता येणे शक्य असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.