पोलीस असल्याची बतावणी करून अल्पवयीन बलात्कार करणाऱ्या दोघांना जन्मठेप

पोलीस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार दोघांना जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय हावरे आणि नितीन साळवे अशी या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींची नावं आहेत.
या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मित्राला भेटायला गेली असता संजय हावरे आणि नितीन साळवे या दोघांनी तिला पोलिस असल्याची बतावणी करून जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. ही घटना ६ जुलै २०१५ रोजी घडली होती. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणाचा तपास अधिकारी तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी तपास करून चार्जशीट न्यायालयात दाखल केली होती. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना बलात्कारच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, संजय हावरे याला याच प्रकरणातील पीडितेला तिचा मोबाइल देण्याच्या बहाण्याने बोलावून परत बलात्कार केल्याप्रकरणी १० दिवसांपूर्वी न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.