#CoronaVirusUpdate : समजून घ्या नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री , अफवा पसरवू नका…

राज्यातील करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने सूचना देऊनही अनेक अफवांचा बाजार गरम आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिवसभरात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन सायंकाळी शासनाची भूमिका आणि कोरोनाच्या दृष्टीने केलेल्या कार्यवाहीची पत्रकारांना माहिती दिली . या उपाययोजनांच्या बाबत आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, सरकारी कार्यालये बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, तसंच लोकल आणि बससेवा अत्यावश्यक असल्यानं बंद होणार नाही, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आणि लोकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या .
दरम्यान सरकारी कार्यालयं सात दिवस बंद राहणार असल्याची आणि मुंबईतील लोकलसेवा बंद होणार असल्याबाबत दिवसभर चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. राज्यातील सरकारी कार्यालये बंद राहणार नाहीत, तसंच लोकल आणि बस सेवा ही अत्यावश्यक आहे. त्यामुळं तीही बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. सरकारी कार्यालयांतील कर्मचारी संख्या ही ५० टक्क्यांवर आणण्याबाबत विचार सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा झाली. राज्यात एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. हा राज्यातील पहिला बळी आहे. राज्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या हि संख्या ४१ झाली असून यात २७ पुरुष आणि १४ महिला आहेत असं त्यांनी सांगितलं . राज्यसरकार योग्य त्या उपाययोजना करीत आहे मात्र राज्यातील जनतेनंही स्वतःच काळजी घेण्याची गरज आहे.जनतेनंही सहकार्य करावं. सहकार्य केल्यास संभाव्य धोकाही टळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.