#CoronaVirusEffect : संसदेचे अधिवेशन आटोपते घ्या म्हणणारांना मोदींनी दिले : हे ” उत्तर….

देशातील वाढत्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन आटोपते घेणारांना उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या सर्व खासदारांना करोना व्हायरससंबंधी जागरुकता पसवण्याची जबाबदारी सोपवताना संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी केला जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. देश आरोग्य संकटाशी झुंज देत असताना खासदारांनी आपलं काम करत राहावं, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीला संबोधित करताना मोदींनी संसदेला ठरल्यानुसार आपलं काम करत राहण्याचा संदेश दिला आहे. दरम्यान यावेळी पंतप्रधानांनी करोना व्हायरसशी लढा देण्यात मदत करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी तसंच उड्डाण सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलंय, असं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर सांगितलं.
पंतप्रधानांनी करोना व्हायरसमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यासाठी फोन करणाऱ्या तसंच पत्र लिहिणाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. यावेळी त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. परंतु, भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी लोकसभा अध्यक्षांना आणि राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सदन स्थगित करण्याची विनंती केली होती. गोयल यांचं हे पत्र मीडियामध्येही प्रसिद्ध झालं होतं. पण मोदींना काही हे पटलं नाही. भाजपच्या खा. हेमा मालिनी यांनीही तशी मागणी केली होती. पण अशी मागणानी करण्याच्या चर्चेवर मोदींनी पूर्ण विराम दिला आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
आरोग्य संस्था, रेल्वे आणि विमान कर्मचाऱ्यांनीही आरोग्य संबंधी कारणांमुळे काम करण्यास नकार दिला तर काय होईल? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. भारताची १३० कोटी जनता काळजी घेत आपलं काम चोखपणे बजावत असेल तर खासदारांनीही आपलं काम बजावायला हवं, असंही त्यांनी म्हटलं. पंतप्रधानांनी पक्षातील खासदारांना शनिवारी आणि रविवारी ते आपल्या मतदारसंघात जातील तेव्हा करोना व्हायरस संदर्भात जागरुकता पसरवण्याचं काम करा असा सल्ला दिल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते राजीव प्रताप रुडी यांनी म्हटलं.