Aurangabad Honor Killing : मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून तरुणाच्या कुटुंबियांवर हल्ला, लहान भावाच्या गळ्यावर तलवारीचे वार करून क्रूर हत्या !!*

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एका तरुणाचं मुंडके तलवारीने छाटून धडापासून वेगळं केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झाल्याचे सांगण्यात येत आहे. लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे ही थरारक घटना घडली आहे. शेजारच्या वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणाने मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून तरुणीचे वडील आणि चुलत्याने त्याच्या कुटुंबियांवर हल्ला केला. यात तरुणाच्या अल्पवयीन धाकट्या भावाचे तलवारीने मुंडके धडापासून वेगळे करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. भीमराज बाळासाहेब गायकवाड (वय-१७) असे मृत तरुणाचं नाव आहे. या हल्ल्यात भीमराज याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खुनासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्हीही आरोपींनी अटक करण्यात आली आहे. बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अमोल गायकवाड (वय-२२) हा १२ मार्चपासून बेपत्ता आहे. शेजारील देवकर वस्तीवरील देविदास छगन देवकर याची २४ वर्षीय मुलगीही बेपत्ता आहे. अमोल यानेच आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय देवकर कुटुंबियांना आहे. त्यामुळे त्यांनी सूडभावनेतून ही हत्या केली आहे. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.