Corona Virus Effect : अखेर प्रशासनाच्या पुढाकारामुळे “त्या ” मृत महिलेवर अंत्यसंस्कार

दिल्लीत करोना विषाणूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यास दिल्लीतील निगमबोध घाट येथे नकार देण्यात आला. यामुळे पीडित कटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कारासाठी नकार मिळाल्यानंतर या कुटुंबाला लोधी रोड येथील स्मशानभूमीतही महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू दिले गेले नाहीत. मात्र, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर आणि प्रशासनाने परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेतल्यानंतर निगमबोध स्मशानभूमीने अखेर महिलेच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्याचा निर्णय घ्यावा लागला. करोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहातून करोनाचा संसर्ग होत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले. हे अंत्यसंस्कार डॉक्टरांच्या देखरेखी खाली करण्यात आले.
दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात या महिलेचा करोना विषाणूमुळे मृत्यू झाला होता. भारतात करोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू होता. मात्र, आज या महिलेवर अत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय निगमबोध घाटावर गेले असताना तेथून त्यांना अंत्यसंस्कारासाठी नकार देण्यात आला. त्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी स्मशानभूमीच्या प्रमुखांना फोन लावून अंत्यसंस्काराची विनंती केली. मात्र महिलेचा मृतदेह इथून ताबडतोब दुसरी कडे न्या आणि अन्य ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार करा असे उत्तर पीडित कुटुंबाला मिळाले. त्यानंतर त्रस्त झालेल्या या पीडित कुटुंबाने अंत्यसंस्कारासाठी लोधी रोड स्मशानभूमी गाठली. इथे अंत्यसंस्कार होऊ शकतील या आशेने कुटुंबीय मृतदेह घेऊन तेथे पोहोचले होते. मात्र, तिथेही त्यांना नकारच देण्यात आला. मात्र, मृतदेहातून करोनाचा संसर्ग होत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने निगमबोधी घाट स्मशानभूमीत या महिलेच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली.