Corona Virus : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १४, ठाण्यातही एक रुग्ण आढळला

Maharashtra Health Minister Rajesh Tope: Two new #COVID19 cases in the state, one each from Mumbai & Thane. Total number of positive cases in the state rises to 14. (file pic) pic.twitter.com/fpa0d9pVYT
— ANI (@ANI) March 12, 2020
दिवसभरात आज कोरोनाची चर्चा चालू असतानाच राज्यात आज तीन रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल आला आहे. यात ठाण्यातील पहिल्याच रुग्णाचा समावेश असून तो ३५ वर्षांचा आहे. हा तरुण फ्रान्सहून आला आहे. तर पुण्यातही एका ३३ वर्षीय व्यक्तीलाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेला आणि दुबईहून परत आलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झालं, त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तर सूत्रांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्येही तिघांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. सर्व करोनाबाधित रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे. आज राज्यात एकूण ५० नवीन संशयित भरती झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान पुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण आढळल्यानंतर पुणेकरांची झोप उडालेली असताना पुणेकरांना पुढचे आणखी तीन दिवस सतर्क राहावं लागणार आहे. पुढचे तीन दिवस पुण्याचं तापमान कमी राहणार आहे, त्यामुळे कोरोनाच्या विषाणूंसाठी हे वातावरण पोषक असल्याने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यात १५ मार्चपर्यंत २७ अंश सेल्सिअसच्या आत तापमान राहणार आहे. हे तापमान करोनाच्या विषाणूंसाठी पोषक असते. त्यामुळे करोनाचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे पुणेकरांनी पुढचे तीन दिवस काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. १५ मार्चनंतर पुण्यातील तापमान वाढणार असल्याने त्यानंतर करोनाचा प्रादूर्भाव कमी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, विदर्भात गारांसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भातील तापमानही कमी होण्याची शक्यता आहे.
पुण्याबरोबरच सोलापूरमध्येही करोनाचा आणखी एक संशयित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे सोलापूरमधील संशयित रुग्णांची संख्या दोन झाली आहे. हा संशयित रुग्ण मोहोळ तालुक्यातील आहे. तो दुबईहून आला होता. त्याच्यामध्ये करोनाची लक्षणं आढळल्याने त्याला सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांनाही उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूर येथील करोनाचा दुसरा रुग्ण पंढरपूर-माळशिरस येथील असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत करोनाचे एकूण १४ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ९ जण पुण्यातील असून २ सोलापूर , दोघे मुंबईतले आहेत. तर एकजण नागपूरचा आहे. त्यामुळे राज्यात करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून राज्यसरकारकडून काळजी घेतली जात आहे.