राज्यसभा निवडणूक : काँग्रेसचंही ठरलं , राजीव सातव , दिग्वीजयसिंग यांच्यासह ९ जणांना राज्यसभा

महाराष्ट्रातील काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांना काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसच्या ९ जणांच्या यादीत मध्य प्रदेशातून पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. राजीव सातव काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
राजीव सातव हे सध्या गुजरात काँग्रेसचे प्रभारी असून ते हिंगोलीचे माजी खासदार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत राजीव सातव यांनी पक्षाला चांगल यश मिळवून दिले होते. यामुळे भाजपला गुजरातमध्ये काठावर बहुमत मिळालं होतं. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. तर २०१४च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून राजीव सातव यांचा विजय झाला होता. २०१० ते २०१४ दरम्यान ते राष्ट्रीय युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.
दरम्यान मध्य प्रदेशातील उमेदवारीवरूनच ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशातून पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये गेल्याने दिग्विजय सिंह यांचा मार्ग मोकळा झाला होता.