ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबरोबर महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि उदयन राजे भोसले यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. दरम्यान यासोबतच भाजपने उदयनराजे भोसले आणि रिपाइंनेते रामदास आठवले यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दिल्लीतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राज्यसभेच्या सर्व उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली.
आज सायंकाळी भाजपने राज्यसभेसाठी आज एकूण ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात आजच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले मध्य प्रदेशातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांना भाजपने मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत मध्य प्रदेशातील एक आणि महाराष्ट्रातील दोन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. महाराष्ट्रातून भाजपने उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासोबत आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनीही उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला संजय काकडे यांनी विरोध केला होता. तर उदयनराजे यांना उमेदवारीसाठी स्वतः माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती. दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचंही नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत होतं. पण त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश करत उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी पुन्हा साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला होता. भाजपने आता उदयनराजे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर रामदास आठवले यांना दुसऱ्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.