माझा आवाज दाबण्यासाठीच सुडबुद्धीने डॉ.तेलतुंबडे यांच्याविरोधात कारवाई : प्रकाश आंबेडकर

राज्य सरकार मला अडकवू शकत नसल्याने माझा आवाज दाबण्यासाठी डॉ.तेलतुंबडेंचे नाव जोडले जात असल्याचाही आरोप आंबेडकरांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे नातेवाईक आणि विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. माझा आवाज दाबण्यासाठीच सुडबुद्धीने डॉ.तेलतुंबडे यांच्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक आरोप केले.
पुण्यातील एल्गार परिषदेशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या नऊ जणांना नक्षलवादी म्हणत बेकायदा कृत्यरोधी कायद्यान्वे यूएपीए जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. डॉ.तेलतुंबडे यांनाही अशाच प्रकारचे फसवण्याचे प्रयत्न केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. डॉ.तेलतुंबडे यांचे संपूर्ण जीवन सार्वजनक क्षेत्रात गेले आहे. गेल्या सरकारला तेव्हा ते नक्षलवादी दिसले नाही. आता कुठल्याही प्रकारचा तपास केल्याशिवायच त्यांना अटक करण्याची भाषा बोलली जात आहे, असं आंबेडकर म्हणाले.
आनंद तेलतुंबडे यांच्यासह आणखी सहा जणांनाही याप्रकरणात गोवल्या जात असल्याचा दावा आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. मुंबई उच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारीला एल्गार परिषदेसंबंधीच्या सुनावणी दरम्यान डॉ.तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांची मुभा दिली आहे. यूएपीए अंतर्गत जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमक्ष येईल, त्याच्या कागदपत्राच्या प्रामाणित मूल्यांची तपासणी करण्याची विनंतीही आंबेडकरांनी न्यायालयाकडे केली आहे. भीमा कोरगाव प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या मागणीबद्दल विचारले असताना फडणवीसांचे नाव ने घेता आंबेडकर यांनी तर एल्गार परिषदेचा खटला पूर्णता: खोटा असून हे प्रकरण निकाली लागलं की संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू असा इशारा प्रकाश आबेडकर यांनी दिला आहे.