Aurangabad : हर्सुलच्या कारागृहातील बंदिवान घेताहेत ‘इंग्लिश स्पिकिंग कोर्स’ धडे , “फिनिक्स”चे मोहन कोरडे यांचा उपक्रम

तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांचे चांगले पुर्नवसन व्हावे म्हणून ‘इंग्लिश स्पिकिंग कोर्स’ सुरू करण्यात आला आहे. ५० बंदिवानाची पहिली बॅच कारागृहात सुरू करण्यात आली असून, तीन ते सहा महिने या बॅचचा कालावधी असणार आहे. अॅड. मोहन कोरडे यांनी कोणतेही मानधन न घेता हा स्पिकिंग कोर्स मंगळवारपासून सुरू केला आहे.
हर्सूल कारागृहाचे अधीक्षक म्हणून हिरालाल जाधव यांनी पदभार हाती घेतल्यानंतर बंदिवानासाठी विविध उपक्रम राबवण्यात सुरुवात केली आहे. कारागृहातील बंदिवानांना इंग्रजी भाषेची संभाषण कला आवश्यक असावी, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. रामलीला शिक्षण प्रसारक व विकास महिला मंडळ या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लोखंडे यांनी “फिनिक्स “चे मोहन कोरडे यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमासाठी सहकार्य मागितले. मोहन कोरडे यांनी देखील तत्परता दर्शवून बंदिवानांना इंग्रजी शिकवण्यासाठी सहमती दर्शवली त्यानुसार हा कोर्स सुरु झाला आहे.
कोणतेही मानधन न घेता अॅड. मोहन कोरडे यांनी हा स्पिकिंग कोर्स मंगळवारपासून सुरू केला. मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या या कोर्सच्या प्रारंभप्रसंगी कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव, वरिष्ठ तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे, शिक्षक एस. जी. गिते, बाळू चव्हाण, रोहिदास बडे, सिद्धू येलगिरे यांच्यासह कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अधीक्षक जाधव यांनी बंदिवानांना मार्गदर्शन करताना, ‘समाज आपल्यापर्यंत पोचलेला आहे. आपल्याला ते करीत असलेल्या मदतीचा उपयोग करावा. भुतकाळ विसरून नव्याने आपले आयुष्य सुरू करावे,’ असे आवाहन केले. महाराष्ट्र कारागृह विभागात बंदिवानांना इंग्रजी शिकवण्याचा हा पहिलाच प्रयोग हर्सूल कारागृहात घेण्यात येत आहे.