उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब ?

महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रिपब्लीकन पक्षाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्त आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी परवा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहांची भेट घेऊन या भेटीत उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्ताब केल्याचे सांगण्यात येत आहे.
आपल्या दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तिथे नेत्यांमध्ये बैठक झाली. उदयनराजे भोसले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते सुधीर मुनगंटीवार आणि धनंजय महाडीक यांचीही बैठकीला उपस्थित होती. या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. तसंच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांवरही चर्चा करण्यात आली. या चर्चेत उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे.