मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांचा राजीनामा…

मुंबई हायकार्टाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. दुसऱ्या राज्यात पदोन्नतीने बदली झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे त्यांना महाराष्ट्र सोडणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे. न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले कि , मला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशपदावर पदोन्नती द्यायला ते तयार नव्हते. त्यामुळे मी गुरूवारी संध्याकाळी राष्ट्रपतींना राजीनामा पाठवल्याचं त्यांनी सांगितलं.”
दरम्यान आतापर्यंत हे स्पष्ट झालेलं नाही की राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा राजीनामा स्विकारला आहे किंवा नाही. मात्र न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी शुक्रवारी वकिलांशी बोलताना सांगितलं की, “हा आपला न्यायालयातील शेवटचा दिवस आहे आणि ते सोमवारी १७ फेब्रुवारीपासून कोर्टात येणार नाहीत.” न्यायमूर्ती धर्माधिकारी २ वर्षांनंतर सेवानिवृत्त होणार होते. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सांगितले की, “मुंबईमध्ये माझ्या काही व्यक्तिगत जबाबदाऱ्या आहेत. आणि त्यामुळेच मी महाराष्ट्राबाहेरील बदली स्विकारू शकत नाही.”
शुक्रवारी सकाळी जेव्हा अधिवक्ता मॅथ्यू नेदमपारा यांनी एका याचिकेवर तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात पुढच्या आठवड्याची तारीख मागितली तेव्हा न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी आपण राजीनामा दिल्याची घोषणा केली. न्यायमूर्ती धर्माधिकारी न्यायालयात म्हणाले की, मी राजीनामा दिला आहे. आज इथं माझा शेवटचा दिवस आहे. अधिवक्ता नेदमपार यांनी नंतर सांगितलं की, जेव्हा न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं तेव्हा मला वाटलं की ते सहज बोलत असतील. ते एक वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या राजीनाम्याबद्दल ऐकून धक्का बसला. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना १४ नोव्हेंवर २००३ साली मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. आणि ते २०२२ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.