Aurangabad News Update : वर्ष उलटले तरी छाजेड खून प्रकरणाचा अद्याप तपास नाही , पटेल यांच्या हत्येचा उलगडा करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

सिटीचौक पोलीसांकडून नागरिकांना आवाहन । सीसी फुटेज, स्केचआधारे मारेक-यांचा शोध
औरंगाबाद : प्रोटॉन कंपनीचे मालक तथा उद्योगपती पारस छाजेड यांच्यावर ३० जानेवारी २०१९ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणातील हल्लेखोर एक वर्ष उलटूनही पोलीसांना सापडलेले नाहीत. मात्र, प्रकाशभाई उर्फ कमलेशभाई पटेल यांचे मारेकरी तरी आता सापडतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण या दोन्ही घटनांची तारिख पाहता केवळ एक दिवस आणि एक वर्षाचा फरक आहे. याशिवाय शहरात झालेल्या मार्च २०१२ मध्ये झालेल्या श्रुती भागवत खून प्रकरणाचा तपासही लागला नाही.
जालना रोडवरील रघुविरनगरात राहणारे प्रोटॉन कंपनीचे मालक पारस छाजेड यांच्या बंगल्यात शिरलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास मंडपाच्या खिळ्याने हल्ला चढवला होता. ही घटना घडल्यानंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीसांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. मात्र, या विशेष पथकाला यश आले नाही. त्यामुळे अद्याप या प्रकरणाचा तपास जैसे थे आहे . दरम्यान ३१ जानेवारी २०२० रोजी भरदिवसा गुलमंडीवरील नगारखाना गल्लीत प्रकाशभाई पटेल यांच्यावर चाकुने वार करुन हत्या केली आहे. याप्रकरणाला अकरा दिवस उलटून गेले आहेत. छाजेड यांच्या हल्लेखोरांचे सीसी टिव्ही फुटेज पोलीसांना प्राप्त झाले नव्हते. हे जरी खरे असले तरी आता मात्र पटेल यांच्या मारेक-यांचे सीसी टिव्ही फुटेज पोलीसांना प्राप्त झालेले आहेत. तरीही मारेक-यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना अद्याप तरी यश आलेले नाही. सिटीचौक पोलीसांनी मारेक-यांचे सीसी टिव्ही फुटेज जारी केले आहेत. तसेच त्यातील एकाचे स्केचही तयार केले आहे. याशिवाय मारेक-यांबाबत माहिती असल्यास पोलीसांना कळवावी असे आवाहन नागरिकांना केले आहे. या दोन्हीही खून प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.