Aurangabad Crime : दीड लाखात विकत घेतलेल्या विधवेशी बळजबरी लग्न अन् तिच्या मुलीवरही अत्याचार, जिन्सी पोलीसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या

गुजरातच्या मेहसानात आवळल्या मुसक्या
औरंगाबाद : विधवा महिलेला केटरिंगचे काम मिळवून देतो असे आमिष दाखवून तिला दीड लाखात गुजरातमध्ये विकलेल्या तिघांना जिन्सी पोलीसांनी अटक केली होती. तर या महिलेशी बळजबरी लग्न केलेल्या कारागिराला गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातून पोलीसांनी आज अटक केली. नीलेश दादाभाई पटेल (रा. पीलवाई, ता. विजापूर, जि. मेहसाना, गुजरात) असे त्याचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , २०१७ मध्ये नारेगाव परिसरातील एका महिलेला पतीचे निधन झाल्याने आता पुढे उदरनिर्वाह कसा करणार, तुला केटरिंगचे काम मिळवून देतो असे म्हणत दोन महिला व योगेश कैलास बोरसे (रा. संजयनगर, बायजीपुरा) यांनी जाळ्यात ओढले होते. तिला केटरिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून मुलीसह तिघांनी गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात नेले. तेथे डायमंडला आकार देण्याचे काम करणा-या नीलेश पटेलशी तिघांनी बोलणी केली. त्यानंतर दीड लाखात या महिलेचा व्यवहार केला. महिलेची विक्री करुन तिचे पटेलशी बळजबरी लग्न लावून दिले. त्यानंतर पटेलने महिलेसोबतच तिच्या मुलीसोबत देखील अत्याचार सुरू केले. हा प्रकार महिला निमुटपणे सहन करत होती. अखेर तिने पटेलच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेतली. महाराष्ट्रात परत आल्यानंतर महिलेने जिन्सी पोलीस ठाणे गाठून ३१ जानेवारी रोजी दोन महिला, योगेश बोरसे व नीलेश पटेल यांच्याविरुध्द अत्याचाराची तक्रार दिली. त्यावरुन पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांना तात्काळ अटक करण्यात आली. तर गुजरातहून उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार संपत राठोड, जमादार हारुण शेख आणि महिला शिपाई निशा खरताडे यांनी नीलेश पटेलला अटक केली.
……
मुलीसोबतही अत्याचार…..
विधवा महिलेशी बळजबरी लग्न केल्यानंतर तिच्या मुलीवर देखील पटेलने अत्याचार केले. या तिघांनी आपल्याला विकल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर तिने स्वत:सह मुलीची सुटका करुन घेतली होती. याप्रकरणाचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक पुनम पाटील या करत आहेत.