Aurangabad crime : पेटीएमच्या भानगडीत व्यापा-याला ५० हजाराचा आॅनलाईन गंडा

औरंगाबाद : पेटीएम सुरू करण्यासाठी व्यापा-याच्या मोबाईलवर संपर्क साधलेल्या भामट्याने अॅप डाऊनलोड करण्याचे सांगत पन्नास हजारांना आॅनलाईन गंडविल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडला.
गारखेडा परिसरातील धनंजय केशव धामणे (५२, रा. रामचंद्रनगर) यांच्या मोबाईलवर सकाळी सव्वादहाच्या सुमारास एका भामट्याने संपर्क साधला. यावेळी त्याने मोबाईलमधील पेटीएम सुरू करण्यासाठी पाठविलेले क्वीक सपोर्ट हे अॅप डाऊनलोड करा तसेच क्रेडिट कार्डबाबत विचारणा केली. याशिवाय त्याने के्रडिट कार्डच्या खात्यातून दहा रुपये त्याच्या खात्यात पाठवायला देखील सांगितले. ही सर्व प्रक्रिया धामणे यांनी पार पाडताच अवघ्या सहा मिनिटात त्यांच्या खात्यातील ४९ हजार ९९९ रुपये भामट्याने आॅनलाईन लांबविले. हा प्रकार लक्षात आल्यावर धामणे यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव करत आहेत.