धक्कादायक : बसला विजेचा शॉक लागून ९ जणांचा मृत्यू

विजेच्या तारेचा धक्का लागल्यामुळे ओडिशामधील गंजाम जिल्ह्यातील गोलंतारामध्ये एका बसला भीषण अपघात झाला. या बसमधील ९ जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत २२ जण जखमी झाले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलपाडु इथून चिकरादा इथं एक खासगी बस जात होती. त्यावेळी रस्त्यात अचानाक ११ किलो वॅटच्या विजेच्या ट्रान्समिशन लाइनच्या संपर्क झाला. विजेच्या धक्क्याने बसमध्ये आग लागली.
बसमधील प्रवासी हे जवळील एका लग्न सोहळ्याला जात होती. स्थानिक लोकांनी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना ब्रम्हपूरमधील एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं आहे.विजेच्या धक्का लागल्यानंतर बसमध्ये आग लागली होती, आगीवर आता अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलं आहे. तसंच विजेचं कनेक्शनही रोखण्यात आलं आहे. बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.
दरम्यान ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून या दुर्घटनेत मृत झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना २ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व प्रवाशांवर सरकारतर्फे मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. परिवहन मंत्री पद्मनाभ बेहरा यांनी या दुर्घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.