शिवसेनेला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही , आम्ही झेंडा बदलला नाही, आमच्यासाठी महाराष्ट्राचे हित आणि विकास महत्वाचा : उद्धव ठाकरे

एक नेता आणि एक झेंडा हीच आजही शिवसेनेची ओळख आहे, मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी पक्षाचा झेंडा बदलावा लागला नाही, असे नमूद करत मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली. सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेना आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मनसेच्या महामोर्चानंतर झालेल्या या बैठकीत थेट मनसेचा उल्लेख झाला नसला तरी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वावर जाणीवपूर्वक भाष्य केले.
सेना आमदार आणि नेत्यांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि , ‘शिवसेनेला हिंदुत्व नव्याने सिद्ध करण्याची गरज नाही. शिवसेना ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार करत आली आहे ते हिंदुत्व बाळासाहेबांचे असून ते शुद्ध आणि पवित्र आहे. त्यात जराही खोट नाही’. एक नेता आणि एक झेंडा हे सूत्र घेऊन शिवसेना वाटचाल करत आली आहे आणि हे सगळ्या जगाला माहीत आहे. त्यामुळे आमचं हिंदुत्व काय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नसून शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्व सोडणार नाही, असे उद्धव यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्री केली म्हणजे शिवसेनेने हिंदुत्वाचा त्याग केला, असे म्हणणे चुकीचे आहे, असेही उद्धव यांनी नमूद केले. शिवसेना हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे आणि राहील. मात्र सध्या आमच्यासाठी महाराष्ट्राचं हित आणि विकास महत्त्वाचा आहे, असेही उद्धव यांनी सांगितले.
काँग्रेस -राष्ट्रवादीचीही राज ठाकरे यांच्यावर टीका
दरम्यान काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले कि , सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधातील आंदोलन महात्मा गांधीजींचा आदर्श समोर ठेवत अहिंसेच्या मार्गाने केले जात आहे. हे आंदोलन कुठल्या जातीचे, धर्माचे नसून ते देशातील संविधान वाचवण्यासाठी आहे. भीमाचे संविधान हेच त्यांचे शस्त्र आहे. यापुढेही हे आंदोलन संविधान वाचवण्यासाठी महात्मा गांधीजींचा आदर्श ठेऊन केले जाईल. तर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले कि , राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच. भूमिका केवळ वैयक्तिक नफा-नुकसान पाहून घेतल्या की मग मोर्चे काढा वा चिथावणीखोर भाषणे करा जनतेच्या दृष्टीने त्यांची किंमत शून्य असते. भाजपाच्या ‘धार्मिक-द्वेष एक्स्प्रेस’ करिता मनसेने इंजिन भाड्यावर दिले पण इथेही ते फेल होईल, असा टोला सावंत यांनी हाणला.