संभाजी भिडेंच्या विरोधात न्यायालयाचे अटक वॉरंट

कर्नाटकातील न्यायालयाने वेळोवेळी समन्स बजावूनही न्यायालयात हजार न राहिल्याने बहुचर्चित शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. गेल्यावर्षी १३ एप्रिल २०१८ या दिवशी बेळगाव जवळील येळ्ळूर या गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी संभाजी भिडे हे प्रमुख पाहुणे होते. आचारसंहिता लागू असतानाही भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आपल्या भाषणातून विधान केलं होतं, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संभाजी भिडे यांच्यासह नऊ जणांवर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र आत्तापर्यंतच्या सगळ्या सुनावणीवेळी संभाजी भिडे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वारंट जारी करण्यात आले आहे, दरम्यान या संदर्भातली पुढची सुनावणी येत्या 24 मार्चला होणार आहे. या आधीही संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले होते.