राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा अखेर राजीनामा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे राजीनामा सुपूर्द करण्यात आला. एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सरकार बदलल्याने रहाटकर यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ५ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नियुक्ती करावी, असा आदेश दिला होता. हा आदेश आयोगाच्या कायद्यातील स्पष्ट तरतूदींविरुद्ध असल्याने रहाटकर यांनी त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात आपण स्वत:हून राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. माझा राजीनामा स्वीकारून कार्यमुक्त करावे अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. मागील साडे तीन वर्षांपासून आयोगाचे अध्यक्षपद सांभाळण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याशिवाय बालकल्याण विभाग, आयोगाचे कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल रहाटकर यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, केवळ राज्य सरकार बदलल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नवी नियुक्ती करावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाचा हा आदेश अनावश्यक व राजकीय स्वरूपाचा असून तो १९९३ च्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायद्याच्या एकदम विपरीत असल्याचे प्रतिपादन विजया रहाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे केले. आयोगाच्या संवैधानिक अध्यक्षपदाला राज्य सरकारचा विशेषाधिकार लागू होत नाही, असेही या याचिकेत नमूद केले होते.