वर्ध्यातील “त्या ” तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा तरुण गजाआड , राज्य महिला आयोगाची जिल्हा पोलीस अधीक्षकांना नोटीस

एकतर्फी प्रेमातून वर्धा येथे तरुणीला जिवंत जाळल्याच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेत वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ अहवाल द्यावा आणि कडक कारवाई करावी असे निर्देश आयोगाने दिले आहेत. आज विदर्भातील वर्धा येथे तरुणीला भर चौकात दिवसाढवळ्या जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या पीडित तरुणीला भरचौकात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात ही घटना घडली. या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणीची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे पीडित तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळाला असून तिची वाचाही गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान आरोपीने हे कृत्य केल्यानंतर तो तिथून तत्काळ पसार झाला. मात्र काही तासांतच पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. विकी नगराळे असे आरोपीचे नाव असून तो तरुणीच्या गावचाच रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे हिंगणघाटमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पीडित तरुणी एका महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिक्षिका आहे. नेहमी प्रमाणे ती कामावर जाण्यासाठी घराबाहेर निघाली तेंव्हा आरोपी तिच्या मागावरच होता. जशी ही तरूणी हिंगणघाटातील नंदेरी चौकात पोहोचली, तसे संधी साधून आरोपीने सोबत आणलेले आणि पेट्रोल तिच्या अंगावर टाकले आणि तिला पेटवून दिले. त्यानंतर जराही न थांबता हा आरोपी तिथून फरार झाला. हा आरोपी नेहमीच तरुणी ज्या बसने पीडित तरुणी हिंगणघाटला येत असे त्याच बसमधून प्रवास करीत होता. आज मात्र त्याने बसने प्रवास केला नाही. आज तो तरुणीच्या आधीच घटनास्थळी दाखल झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान हिंगणघाट चौकात उतरल्यानंतर ही तरुणी काही अंतरावर असलेल्या महाविद्यालयात पायी जात असे. ही घटना घडल्यानंतर तिचा आरडोओरडा ऐकून आजुबाजूच्या लोकांनी तातडीने पीडित तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. घडलेल्या प्रकारामुळे महाविद्यालयातील तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.