प्रजासत्ताक दिन विशेष : राष्ट्राला उद्धेशून पूर्वसंध्येला काय बोलले राष्ट्रपती रामनाथ कोविंद ?

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केले. प्रारंभी राष्ट्रपतींनी देशातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या सर्वांगिन विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघाची भूमिका महत्त्वाची आहे. संघर्ष करणाऱ्यांनी विशेषत: युवकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अहिंसेचा संदेश संदेश लक्षात ठेवावा. राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीबरोबर देशाच्या कल्याणासाठी एकजुटीने पुढे जायला हवे, असे मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केले.
राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले कि , संविधानाने सर्वांना नागरिक म्हणून काही अधिकार प्रदान केले आहेत. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूतेप्रती आपण सर्वच कटीबद्ध आहोत. यावेळी कोविंद यांनी केंद्र सरकारच्या योजनांची प्रशंसा केली. जनकल्याणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. देशातील नागरिकांनीही स्वत:हून या योजना लोकप्रिय केल्या आहेत. जनतेच्या सहभागामुळेच स्वच्छ भारत अभियान अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झाले आहे. इतकंच नव्हे तर गॅस सबसिडीचा त्याग करण्यापासून ते ऑनलाइन व्यवहारांपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत जनतेने हिरहिरीने भाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
जम्मू-काश्मीर असो की लडाख असो. पूर्वेकडील राज्य असोत की हिंद महासागराजवळील बेटं असोत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात संपूर्ण विकास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. देशाच्या विकासासाठी मजबूत अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असणेही महत्वाचे आहे. त्यामुळेच देशांतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, असं ते म्हणाले. देशातील कोणतंही मुल किंवा कोणताही तरुण शिक्षणापासून वंचित राहणार नाही हाच आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी इस्रोच्या कामगिरीचंही कौतुक केलं. तसेच भारतीय लष्कर, अर्धसैनिक दल आणि अंतर्गत सुरक्षा दलाचीही राष्ट्रपतींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. देशाची अखंडता, एकता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी लष्कराने दिलेलं योगदान आणि बलिदान अतुलनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. अनिवासी भारतीयांच्या योगदानाचीही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात दखल घेतली.
सहा दशकांपूर्वी आपले संविधान लागू झाले. देशातील जनतेनेच सरकारच्या अभियानांना ‘जनअभियाना’चे रूप दिल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. राष्ट्रविकासात महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता कायम आहे. सत्य आणि अहिंसा हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश आजच्या परिस्थिती गरजेचा झाला आहे. कोणत्याही उद्देशासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांनी विशेषतः तरुणांनी गांधीजींचा अहिंसेचा मंत्र कायम लक्षात ठेवला पाहिजे. जो मानवी मूल्यांसाठी सर्वात मोठी भेट आहे. देशाच्या विकासासाठी सक्षम अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असणं आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने देशातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण पाऊले टाकली आहेत. संविधानाने आपल्याला लोकशाही अधिकार दिले आहेत. पण, न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवे, असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.