रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेकडून राष्ट्रीय मतदार दिन साजरा

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेतर्फे मताधिकार जनजागृती अभियान दादर रेल्वे स्थानकाजवळ राबविण्यात आले. भारतातील वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार असल्याची जाणीव या मतदार जनजागृती अभियानाच्या माध्यमातून करून देण्यात आली.
रिपब्लिकन विद्यार्थी संघटना तसेच विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतर्फे दादर रेल्वे स्थानकाच्या आवारात मतदारांना जागृत करणारे संदेशाचे फलक आणि मतदारांना जागृत करणाऱ्या घोषणा देऊन मतदारांना मतदानाच्या अधिकाराची जाणीव करून देण्यात आली. तसेच वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना यावेळी मतादानाचे महत्व पटवून देण्यात आले. त्याबरोबर मतदार यादीत नाव नोंदण्याचे आवाहनही करण्यात आले.
भारतीय लोकशाही सदृढ करण्यासाठी मतदान केले पाहिजे, असा संदेशही विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला. या अभियानादरम्यान रिपब्लिकन संघटनेच्या अध्यक्षा शीतल गमरे, कार्याध्यक्ष आदेश पगारे, विशाल काळे, कीर्ती कांबळे आणि सागर पडेलकर, संदीप पालवे यांसहित रिपब्लिकन जनआंदोलनचे पदाधिकारीही उपस्थित होते. तसेच विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही या अभियानात आपला सहभाग नोंदवला.