‘पोलिटिकल किडा’ : शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याला मोदींचा चेहरा लावल्याने खा. संभाजी महाराजही संतप्त

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 21, 2020
‘पोलिटिकल किडा’ या ट्विटर हँडलवरून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावल्यामुळे खा. संभाजी महाराज यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , ‘पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. हे अशोभनीय, निषेधार्ह आणि सहन करण्यापलीकडचं आहे. संबंधित पक्षानं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसंच, केंद्र सरकारनं चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी,’ अशी मागणी केली आहे. ‘आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. आमच्या भावनांची कदर करून अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही राजकीय पक्षानं गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करू नये,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
दरम्यान खा. संभाजी महाराज यांच्या ट्विटवरवरून शिवभक्तांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया देतांना संभाजी महाराजांनाही प्रत्युत्तर दिले आहे.
सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी व अमित शहा यांची तानाजींशी तुलना करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं वादाला तोंड फुटलं आहे. महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून भाजपनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आपण ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यंना पाठवल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली बंद करणारे या व्हिड़िओवर काय प्रतिक्रिया देतात ते पाहायला हवे, असे म्हटले आहे.
‘पोलिटिकल किडा’ या ट्विटर हँडलवरून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘तान्हाजी’ सिनेमातील दृश्ये मॉर्फ करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक चित्रफित व्हायरल करण्यात आली आहे. याआधी भाजपचे दिल्लीतील एक नेते जयभगवान गोयल यांनी मोदींची शिवरायांशी तुलना करणारे पुस्तकच प्रकाशित केले होते. त्यावरून उठलेलं वादळ शमत नाही तोच हा व्हिडिओ आल्यानं शिवप्रेमींमध्ये संताप आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपवर तोफ डागल्यानंतर संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.