Aurangabad : मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणे जालना आणि लातूरच्या शिवसैनिकांना का पडले महागात ?

औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडे हे जेथे जातील तेथे त्यांचे प्लास्टिकवर लक्ष असते . बंदी असलेले प्लास्टिक कोणी कुठे आणले , त्यांनी पहिले आणि त्यांनी दंड फर्मावले नाही असे सहसा होत नाही. बीड येथे पोस्टिंग असताना त्यांनी स्वतःलाही दंड करताना सोडले नव्हते . औरंगाबादेतही त्यांनी हि संधी सोडली नाही . त्याचे झाले असे कि , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ देणं दोन शिवसैनिकांना चांगलच भोवलं. मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ आणल्यामुळे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना तात्काळ दंड ठोठावला. मुख्यमंत्री थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये आयुक्तांनी ही कारवाई केली.
महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे घेण्यासाठी पांडे जेंव्हा औरंगाबादेत आले तेंव्हा पालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आर.एम. महाजन यांनी त्यांच्या स्वागतासाठी प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ आणला होता. आयुक्तांनी तात्काळ महाजन यांना त्यावेळीही पाच हजारांचा दंड ठोठावला होता. याशिवाय भाजपच्या नगरसेविका मनिषा मुंडे यांनी त्यांच्या स्वागतासाठी पेन आणला होता. पेन गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळून आणला होता, गिफ्ट पेपरला प्लास्टिकचे आवरण होते, ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी मुंडे यांना देखील दंड ठोठावला होता.
दरम्यान आज शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी रामा हॉटेलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. लातूर येथील पदाधिकारी रामेश्वर पाटील आणि जालना येथील पदाधिकारी मनीष श्रीवास्तव यांनी यावेळी प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ आणला होता. आयुक्तांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी सोबतच्या अधिकाऱ्यांना आदेश देत त्या दोघांना दंड आकारण्याचे सांगितले. आयुक्तांच्या आदेशानुसार त्या दोघांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करुन त्यांना पावत्याही देण्यात आल्या.