ब्राह्मण महासंघाने धमकी दिल्याची ज्येष्ठ कवी ना. धो . महानोर यांची माहिती , सरकारने दिले तत्काळ संरक्षण

आजपासून उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ब्राह्मण महासंघाने संमेलनाचे उद्घाटक कविवर्य ना. धों. महानोर यांना दिली असल्याचे वृत्त आहे. मात्र अशी धमकी मिळाल्यानंतरही ना . धो . महानोर यांनी संमेलनाला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला आहे . संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यापासून हे संमेलन वादात सापडले आहे. दरम्यान ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची प्रकृती बिघडली आहे त्यामुळे ते उद्या सकाळी होणाऱ्या साहित्यदिंडीला हजर राहू शकणार नाहीत. फ्रान्सिस दिब्रेटो यांना मणक्याचा त्रास जाणवू लागल्याने ते ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार नाहीत. त्याचप्रमाणे उद्घाटक ना. धो. महानोर उस्मानाबादेत दाखल झाले असले तरी त्यांना गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने या ग्रंथदिंडीला हजर राहू शकणार नाहीत.
या साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन संध्याकाळी होणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ग्रंथदिंडीची परंपरा साहित्य संमेलनात पाळली जाते. यावेळीही ग्रंथदिंडी निघणार आहे मात्र या ग्रंथदिंडीला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो आणि उद्घाटक ना. धो. महानोर हे दोघेही प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आजच साहित्य संमेलाचे उद्घाटक ना. धो. महानोर यांना साहित्य संमेलनाला जाऊ नका अशी धमकी ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आली. तसेच त्यांना यासंदर्भातले काही फोनही आले. मात्र मी कोणत्याही धमकीला घाबरत नाही असे सांगत ना.धो. महानोर यांनी साहित्य संमेलनाला जाणार असल्याचं स्पष्ट केलं. त्याप्रमाणे ते उस्मानाबादला पोहचलेही. मात्र त्यांना गुडघेदुखीचा त्रास होऊ लागल्याने ते उद्या होणाऱ्या ग्रंथदिंडीत सहभागी होऊ शकणार नाहीत. दरम्यान महानोर यांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याने त्यांना पोलीस संरक्षण दिलं आहे.
ना. धो. महानोर यांना आलेल्या धमकीची दखल घेऊन , गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महानोर यांना तातडीने सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश दिले आहेत. धमकीचं पत्र आल्याची माहिती स्वत: महानोर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्र दिल्याचं महानोर यांनी सांगितलं. शिवाय विविध राज्यातून धमकीचे फोन येत असल्याचेही ते बोलले. ते म्हणाले, ‘१० जानेवारी रोजी सुरु होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड एकमताने करण्यात आली. ही निवड प्रक्रिया करण्याची एक पद्धत आहे तो संकेत पाळूनच ही निवड झाली आहे. यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही,हे सगळं मी त्यांना समजावून सांगितलं मात्र तरीही त्यांनी तुम्ही साहित्य संमेलनाला जाऊ नका असं मला बजावलं आहे.’
दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली होती. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे. मराठी साहित्यात दिब्रिटो यांचे योगदान नाही, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांतर्फे सातत्याने करण्यात येत आहे.